वर्गखोलीपलीकडचं शिकणं








शाळेच्या आवारात एक बाबा आणि त्याची छोटीशी लेक एकमेकांचा हात धरून फिरत होते, अत्यंत कौतुकाने शाळेच्या इमारतीकडे पाहत होते. थोडे बिचकतच ते इमारतीत शिरले.
“इथे आमचा पाचवीचा वर्ग होता…”
“ही बिल्डिंग नव्हती बरं का पूर्वी इथे…”
बाबा लेकीला सांगत होता. तो वर्गात शिरला, प्रेमाने तिथल्या बाकावर हात फिरवला…
असे बरेच माजी विद्यार्थी शाळेत येत असतात… कधी नवऱ्याला घेऊन आलेली बायको, तर कधी बायकोला घेऊन आलेला नवरा. कधी मुलांना शाळा दाखवायला घेऊन आलेले आई किंवा बाबा, कधी थेट नातवंडं आणि आजी आजोबाही! त्यांना त्यांचा वर्ग, त्यांचे शिक्षक आठवत असतात. आताचं शाळेचं स्वरूप पाहून त्यांना छान वाटतं. आपली शाळा अजूनही नुसती सुस्थितीत नाही, तर अनेक नवीन गोष्टींनी समृद्ध आहे, याचा अभिमान वाटतो. MSCIT या कॉम्प्युटर कोर्सपासून भरतनाट्यमच्या वर्गापर्यंत कितीतरी नवीन उपक्रम शाळेत होताना दिसल्यावर पुन्हा एकदा त्यांना शाळेशी जोडून घ्यावंसं वाटतं.
पालकांची विशेष पालकसभा घेऊन आपण शाळेतल्या वर्गखोलीव्यतिरिक्त असलेल्या जागा दाखवतो. त्यात वाचनालय आणि प्रयोगशाळा असते, संगणक केंद्र असतं, समुपदेशन केंद्र असतं, ऑडिओ व्हिज्युअल रूम असते, स्मार्ट बॉर्ड्स असतात, मैदानावर वापरण्याचं साहित्य असतं… या सगळ्या नुसत्या जागा आणि साहित्य नाही. या शिकण्याच्या वेगवेगळ्या संधी आहेत. शाळेत मुलं समुहात दिसत असली तरी शिकताना ती आपापल्या पद्धतीने आपापलं शिकत असतात. प्रत्येक मूल ‘युनिक’ असतं. हे लक्षात घेऊन या सर्व जागा जिवंत ठेवण्याचं काम शिक्षक करत असतात.