शिकवणारे कोपरे








शिशुगटातली एक मुलगी मण्यामध्ये दोरी ओवत होती. काही केल्या दोरीचं टोक मण्याच्या भोकातून जात नव्हतं. यात तीन-चार मिनिटं गेली. ताई बघत होत्या, पण त्यांनी जाऊन तिला मण्यात दोरी ओवून दिली नाही. मग बहुतेक तिचं तिलाच लक्षात आलं की दोरीच्या फिस्करलेल्या टोकालाच काहीतरी केलं पाहिजे. तिने बोटांनी ते टोक जुळवून घेतलं आणि मग दोरी भोकातून ओवली गेली.
बालवाडीत हे घडतं कारण इथली शिक्षणपद्धत मुलांना स्वतंत्र विचार करण्याची संधी देणारी आहे. त्यासाठी वेगवेगळ्या संधी असणारे कोपरे वर्गात मांडलेले असतात. त्यात बाहुलीघर असतं. ठोकळे आणि इतर साहित्य घेऊन रचना करण्याचा कोपरा असतो. एका कोपऱ्यात मराठी, इंग्रजी पुस्तकं असतात. कलेच्या कोपऱ्यात चित्रकलेचं साहित्य असतं. याशिवाय पझल, ओवणे, विज्ञान, गणित असे विविध कोपरे असतात.
शाळेत आल्यानंतर स्वतः निर्णय घेऊन मुलं त्यांना हवा तो कोपरा निवडतात. तिथे जाऊन काय करायचं, ते कसं करायचं हे स्वतः ठरवतात. ताई वर्गात फिरून कोणतं मूल काय करतंय, याचं फक्त निरीक्षण करत असतात, एखाद्या मुलाबद्दल काही विशेष आढळलं तर त्याची नोंद स्वतःकडे करून घेत असतात. मुलं करून बघतात, मोडतात, पुन्हा करतात. अनुभवातून स्वतःची स्वतःच शिकत जातात. हे होत असताना ती छोट्या, छोट्या गटात असतात. तिथे संवाद घडतो. परस्पर संवादातूनही शिकणं घडतं.
निर्णय घेणं आणि त्याप्रमाणे कृती करणं, एकमेकांकडून शिकणं हे आपल्या शाळेत मुलं बालवाडीतच शिकतात.