इंग्लिशसाठी नव्या वाटा








‘मातृभाषेतून शिकणं उत्तम आणि त्यामुळे मुलांनी मराठी शाळेतच शिकावं,' असं अनेक पालकांना वाटत असतं. पण त्याच वेळी ‘इंग्लिशचं काय? आजच्या काळात ते चांगलं यायलाच हवं,’ असा प्रश्नही पडत असतो.
शाळा पालकांची भावना समजूच शकते. आपली मुलं भविष्यात कुठेही कमी पडू नयेत असं शाळेलाही वाटत असतं आणि इंग्लिश पक्कं करण्यासाठी शाळा वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न करत असते. प्राथमिक शाळेपासून सुरू होणारे हे प्रयत्न पुढे माध्यमिकमध्ये अधिक व्यापक होतात.
आता पहिलीपासून अभ्यासक्रमातच इंग्लिश आहे. पहिल्या दोन इयत्तामध्ये मुलं भरपूर इंग्लिश ऐकतात. तिसरीपासून, इयत्ता कोणतीही असो, प्रत्येक मूल इंग्लिशमध्ये कोणत्या टप्प्यावर आहे हे तपासलं जातं आणि आहे तिथून पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जातात. Speaking, reading, understanding अशा विविध अंगांनी काम केलं जातं.
चौथीपासून Spoken English चे स्वतंत्र वर्ग घेतले जातात. मुलांना ऐकण्याच्या आणि बोलण्याच्या सतत नव्या संधी मिळतात. पाचवीपासून शाळेने 'bilingual approach' घेतला आहे. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत सहज जाता यावं यासाठीची ही एक पद्धत. विविध विषयांतील मराठी पारिभाषिक शब्दांचे इंग्रजी शब्द शिकण्यापासून सुरुवात होते आणि पुढे एका भाषेतील मजकुरावर दुसऱ्या भाषेत विचारलेले प्रश्न सोडवण्याचा सराव केला जातो. 'बायलिंग्वल'ची परीक्षाही होते. वरच्या इयत्तामधली मुलं खालच्या इयत्तामधल्या मुलांची परीक्षा घेतात. एका भाषेतल्या शब्दाला दुसऱ्या भाषेतला शब्द विचारताना उत्तराच्या जवळ नेणारे क्लू देतात. या प्रोसेसमध्ये दोघंही शिकतात.
आणि मग मातृभाषेतून शिकतानाही इंग्लिशमध्येही पुढे जाण्याचा आत्मविश्वास मुलांना शाळेतूनच मिळतो.